सुगरणीचा खोपा © सुयोग शहा
PC : HARSHAD TAKLE
खोप्यामधी खोपा सुगरणीचा खोपा!
पाखरांच्या दुनियेतील पक्ष्यांची घरटी इतकी चित्र विचित्र आणि विविध आकाराची असतात की, त्यावर एक पुस्तक लिहिता येईल. पण ते कामही घरटं बांधण्याइतकंच कठीण आहे. एक वेळ पुस्तक लिहिणं सोपं आहे, पण घरटं बांधणं फार कठीण काम आहे. ते पक्षीच करू जाणे. गवताची काडी काडी गोळा करून ती फांद्यांना बांधायची व त्यावर पुन्हा एक एक काडी गुंफायची ही अजब करामत पक्षी कशी काय करतात कोण जाणे. बरं एकदा घरटं बांधलं तर ते उन्हा-पावसात किंवा वादळवा-यात टिकवणं हे महाकठीण काम त्यांना करावं लागतं. वादळवा-यात फांद्या वर खाली होत असताना घरटयातील पक्षिणी आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन त्यांचं संरक्षण करते ते याच घरटयात ! असं मजबूत घरटं बांधावं हे त्यांना कसं काय सुचतं ? माणसाचं ठीक आहे त्याला देवानं जरा सुपर मेंदू दिल्याने तो आता चंद्रावर सुद्धा घर बांधायला निघाला आहे. तसं पाखराचं नाही, पण माणसाला जसे ऊन- पावसापासून संरक्षण करण्यासाठी घर बांधण्याची कल्पना सुचली, तशीच पाखरांनाही घरटी बांधायची कल्पना सुचते याचा अर्थ माणूस काय किंवा पक्षी काय गरज लागली की त्यांना शोध लागतात किंवा परिस्थितीचं माणसाला काय किंवा पाखराला काय कसे जगायचे हे शिकवते.
PC : HARSHAD TAKLE
वास्तुकलेच्या किंवा वास्तुरचनाशास्त्रात मानवाने एवढा आश्चर्यकारक आणि क्रांतिकारक विकास केला आहे त्याचं कौतुक करावे तेवढे थोडेच ! प्राचीन काळी तर काही साधने नसताना माणसाने जगातील नऊ आश्चर्य निर्माण केलीत. त्यापैकी आज हजारो वास्तूंना ‘हेरिटेज’ चा दर्जा प्राप्त झाला आहे. आजही आधुनिक काळात जागतिक नामवंत इंजिनीअर टॉवर्स बांधून त्यात भरच घालीत आहेत. मानव महत्त्वाकांक्षी आहे. त्याला घरे बांधण्यासाठी जमीन अपुरी पडू लागली असून आज तो आकाशात झेप घेऊन चंद्रावर घरे बांधण्याच्या गोष्टी करीत आहे. असेच आश्चर्यकारक व नऊ आश्चर्यात मोडेल अशी घरटयांची रचना आपल्याला पक्ष्यांच्या विश्वात बघायला मिळते ते म्हणजे दहावे आश्चर्य शोभेल असे घरटे म्हणजे सुगरणीचा खोपा ! भल्या भल्या आर्किटेक्ट आणि इंजिनीअर्सनी तोंडात बोट घालावी अशी घरटयाची रचना करणारी सुगरण पक्षि म्हणजे उत्कृष्ट कारागीर होय.
PC : HARSHAD TAKLE
खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला।
तिच्या पिलासाठी तिने झाडाला टांगला।।
पिले निजति खोप्यात जसा गं बंगला।
तिचा पिलामधी जीव तिने झाडाला टांगला।।
कवयित्री बहिणाबाईंच्या या कवितेत सुगरणीचा जीव कसा आपल्यासाठी टांगला ही पक्षिणीची तिच्या पिलांच्या प्रति असलेली माया कळतेच. पण आपल्या पिलांच्या संरक्षणासाठी ती आपला खोपा उंच झाडाला टांगते हे कळून येते. इथे आपल्याला सुगरणीच्या घरटयाचे वेगळेपण दिसून येते.
PC : HARSHAD TAKLE
पक्ष्यांच्या दुनियेतील घरटं बांधणी क्षेत्रात अनेक गृहरचनाकार आहेत. परंतु त्यातही सुगरण, सुतारपक्षी व गरूड व मधमाशी हे बडे बिल्डर्स ! त्याच्यासारखी घरटी कुणालाच बांधता येणार नाहीत. सुगरणीचं घरटं म्हणजे कारागिरीचा कळस म्हटला पाहिजे.
पशुपक्ष्यांना बुद्धी नाही असे आपण म्हणत असतो तरी मानवाच्या बुद्धीलाही ही सुगरणीच्या घरटयाची कारागिरी येणार नाही. अगदी मानवाने आपला कॉम्प्युटर वापरला तरी अशी घरटयाची वीण त्यालाही येणार नाही. सुगरणीच्या घरटयाची कारागिरी पाहून सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई म्हणतात-
खोपा इमला इमला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा
तिची इलुशीचं चोच
तेच हात तेच ओठ
तुला दिली रे देवानं
दोन हात दहा बोटं!
केवळ एका चोचीनं सुगरण पक्षी असं अफलातून घरटं बांधतो तेव्हा माणसाच्याही कारागिरीला मर्यादा आहेत हे कळते. सुगरण पक्ष्यासारखं आर्किटेक्चर मी तरी पशुपक्ष्यांच्या घरटयात पाहिलं नाही. इतर पक्षी चार गवताच्या काडया उभ्या आडव्या गोल टाकतात आणि मऊ कापूसपाला टाकून बसण्यासाठी किंवा अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा ठेवतात. विशेष म्हणजे सुगरणीचं घरटं झाडाच्या फांदीला टांगलेलं असतं. असं हँगिंग होम अजून माणसालाही बांधता आलं नाही. सुगरणीचा खोपा बाहेरून दिसायला लांबुळका असतो. वरती फांदीला आधी मजबूत गवताने बांधून तो बांधायला सुरुवात केली जाते. मग काही भाग गवताने गुंफल्यावर त्याला लंबगोलाकार आकार दिला जातो. घरटयाचे मुख मातीशी समांतर असते. त्याच्या गोलाकार भागात दोघांना बसण्याची जागा व मऊ कापसारखे बेडरूम असते त्यात सुगरण अंडी घालते व आपल्या पिलांना सांभाळते. सावरीच्या मऊ कापसाची व मखमली गवताची छान बेडरूम पाहून पक्षी आपल्या अंडयांची व पिलांची किती काळजी घेतात हे कळून येते. सुगरणीच्या खोप्यात खालून वरती जाण्याची सोय असते आणि त्याची गवताची वीण इतकी घट्ट असते की ते उचकटता येत नाही.
PC : HARSHAD TAKLE
सुगरण पक्ष्याला सुगरण हे नाव कसे पडले हे मला ठामपणे माहिती नाही. कारण सुगरण म्हणजे चवदार स्वयंपाक करणारी स्त्री असा अर्थ केला जातो. सुगरणीचा हा खोपा म्हणजे पक्ष्यातलं जगावेगळं घरटं आहे. असं घरटं कोणत्याच पक्ष्याला बांधता येत नाही. बरं हे घरटं असं जाळीदार गुंफलेलं असतं की ते उन्हाळ्यात थंडगार व हिवाळ्यात उबदार असते. बरं ते उंच फांदीला टांगलेलं असल्याने इतर शत्रू पक्ष्यांपासून त्याचा बचाव होतो. समजा असं टांगतं घर कुणी बांधलंच तर ते त्यात जायला दोरीची शिडी लागेल. कोणत्याही स्त्रीला आपलं घर म्हणजे आपलं सर्वस्व असतं. ते तिच्या आयुष्यात साकार झालेलं एक स्वप्न असतं आणि हे स्वप्न साकार व्हावं म्हणून ती आयुष्यभर काबाडकष्ट करीत असते. तिचं ते घर म्हणजे चार भिंती नसतात, तर तिचं सारं कुटुंब त्यातल्या त्यात नवरा आणि मुल-बाळं असतात. त्यांच्यासाठीच ती आपलं तन, मन, धन त्या घरासाठी वेचत असते. त्यात ते घर तिचं स्वत:चं असेल तर तिला आपण जगावर राज्य करतोय असे वाटते. या सगळ्या गोष्टी सुगरण पक्षिणीला लागू होतात.
सुगरणीचा खोपा © सुयोग शहा

सर तुम्ही लिहीलंय पण छान - अन् माहिती सह फोटो पण सुंदर आहेत - एकंदर काय तर हा ब्लॉग तुम्ही सुगरणीच्या खोप्या सारखाच सुरेख गुंफला आहे - धन्यवाद - मजा आ गया ! संदीप अघोर LIC नाशिक .
ReplyDelete