Thursday, July 23, 2020

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा - © सुयोग शहा

                 


© सुयोग शहा

कविश्रेष्ठ (गदिमा) ग.दि.माडगूळकर यांचे शब्द आणि संगीतकार, महान गायक सुधीर फडके उर्फ बाबूजींच्या स्वरांची ती जादू.. बाबुजी यांचा आवाज हा वेगळाच. मुलायम आणि तरीही अत्यंत धारधार. अप्रतिम, हळवे करणारे गदिमांचे शब्द व बाबूजींच्या आवाजात मन प्रसन्न करणारे आणि जीवनाचे सार सांगणारे गीत रामायणातले हे गीत आहे. अर्थात या विषयी मी लिहावे एवढी माझी योग्यता नाही, पण तरीही माझ्या मनातले जे भाव आहेत ते शब्दात टिपण्याचा एक निर्मळ प्रयत्न मात्र आज मी करीत आहे. 

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषितात 

राज्य त्याग कानन यात्रा, सर्व कर्मजात 

खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा 

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा… 

माझ्या मनातलं माझं आवडीचं गाणं सांगायचं तर ते गीत रामायणातलं ‘दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.’ ग. दि. माडगूळकरांची ही अर्थपूर्ण रचना व सुधीर फडक्यांचा मधुर आवाज अशा संगमातून साकार झालेलं हे गाणं मनाचा ठाव घेतल्या शिवाय राहात नाही. प्रत्येक कडव्यात एक सत्य सांगितलं आहे. ह्या गीतातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ प्रभू श्रीरामाने भरत व अयोध्या वासीयांचा निरोप घेणं हे दृष्य नजरे समोर तंतोतंत उभं करणारे आहे. गदिमांच्या काव्य प्रतिभेचं हेच तर वैशिष्ट्य आहे. 

                      

लहापणापासूनच माझ्या बाबांचे देखील गीतरामायण हा खूप आवडीचा विषय आहे.अनेक वेळेस मी त्यांना जर काही ऐकत असल्याचे किंवा गुणगुणत असल्याचे बघितले असेल तर ते गीतरामायणाचं बोल असत. गेली अनेक वर्षे गीतरामायणातील गाणी मी देखील प्रसंगानुसार ऐकत आलो आहे आणि सध्या माझी सकाळ हि देखील गीतरामायणाने होत असते याचा विशेष आनंद होतो. मला सुधीर फडके यांच्या आवाजातलं ‘गीतरामायण’ ऐकण्याचं भाग्य मिळालं असे मी समजतो. दहा कडव्यांचं हे गाणं श्रीरामाच्या भावनांचा आविष्कार आहे. बंधू भरताचा निरोप घेताना प्रभू श्रीरामाने ‘मी वनात जात आहे, तू अयोध्येचं राज्य सांभाळ, असा उपदेश केला आहे. 
         

दैवजात दुःखें भरतां
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा 

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग कानन यात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा 

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा 

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा?
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा 

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा 

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले… 

पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा दोष ना कुणाचा। गीतरामायणा मधले हे गीत ऐकत असताना कारूण्य आणि भक्तीरसाने ओथंबलेला काही वेगळाच तर सध्याच्या काळात हे गीतरामायणतील अजरामर काव्य खरचं किती बोलकं आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या एका छोट्या विषाणूने परग्रहावर जीवसृष्टी शोधणाऱ्या अचाट बुद्धिमत्तेच्या मानवाच्या अहंकाराला एका झटक्‍यात संपवले आणि जाणीव करून दिली की मानव या पृथ्वीचा मालक नसून इथला पाहुणा आहे. मानवा खेरीज असलेल्या जीवसृष्टीच्या जतनाची नैतिक जबाबदारी मानवावरच आहे. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” हे खरे आहे. सृजनाचा विनाश करणारी कुबुद्धी फक्त मानवाला आहे. हे "भवताल' आपले नाहीच ते मानव खेरीज इतर जीवसृष्टीचे देखील आहे. 

सगळं जग या एका कोव्हिड-१९ च्या नायनाटासाठी शर्थीने लढतयं, अनेकांचे मृत्यू होत आहेत, कित्येक जणांना या विषाणूचा संसर्ग होतोय ! 

जगभरात लाखों लोकं या समस्येत अडकली आहेत. आशेची वात तेवती ठेऊन आज कित्येक डॉक्टर्स, नर्सेस्, शास्त्रज्ञ यावर उपाय योजना करत आहेत, अनेक फार्मा कंपन्या अनेक क्लिनिकल ट्रायल करीत आहेत... पण तरी अजूनही या प्रयत्नांना यश मिळालं नाही आहे. 

या परिस्थितीतून बाहेर आल्यानंतर यातून काही तरी शिकून आपल्यात बदल केला तर निसर्गाने दिलेल्या संधीचे आपण सोने केले असे म्हणता येईल. जिवनाचे हे सत्य आजं लख्ख प्रकाशात तळपतयं. माणसातील अहम्, त्याची समाजातील प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी आज दुय्यम स्थानावर आहेत, कारण जगण्याची स्पर्धा प्रत्येकालाचं जिंकायची आहे. ही पराधिनता, अनिश्चितता लवकरात लवकर संपो ही आशा!! 

आज या भयानक आजाराशी अनेक लोक यात मृत्यूमुखी पडली त्यांच्या कुटुंबियांच्या मनी हीचं भावना असेल की,

“ दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा 

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..... 

© सुयोग शहा 

Monday, July 20, 2020

प्राजक्त - © सुयोग शहा


प्राजक्त - © सुयोग शहा





प्राजक्त पाहिला की नकळत आठवतात त्या व. पुं.च्या ओळी-


पारीजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल,पण लयलुट करायाची ती सुगंधाचीच. 

प्राजक्ता ची फुले म्हणे पहाटेच दरवळतात कारण देवाने म्हणे प्रत्तेकाच्या दरवळण्याची वेळ लिहूनच ठेवली आहे. प्राजक्त म्हटलं की श्रावण आणि श्रावण म्हटलं की प्राजक्त असं गणित सहसा बघायला मिळत. प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा, त्याचा मंद सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणापासून आमच्या घरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी प्राजक्ताचा पडलेला सडा पाहताना मला खूप मजा वाटायची. सध्या आमच्या दारातील प्राजक्त हा घरासमोर रस्त्यापलीकडे आहे इतकेच काय ते. लहानपणी आम्ही प्राजक्त ची फुल खूप वेचायचो. ऊन्हाळ्याच्या सुट्टित मी तारापूर येथे माझ्या आजोबा यांच्या घरी जायचो. आमच्या आजोबांच्या घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड होते. रोज सकाळी त्याच्या फुलांचा सडा पडलेलला असायचा. रोज सकाळी जेव्हा आजोबा पूजेला बसायचे तेव्हा मी त्यांना प्राजक्ताची फुले वेचुन द्यायचो त्याची आज प्रकर्षाने आठवण झाली. निसर्गाच्या सानिध्यात रमण्याची एकही संधी मी सोडत नाही. 




प्राजक्त माझे आवडीचे फुल. इतके नाजुक कि आपल्या हळुवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे, उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणुनच कदाचित रात्री उमलणारी. रात्री फुलांनी बहरलेला प्राजक्त पाहिलायं.
आकाशात असंख्य प्रकट झालेल्या तारकांसारखा भासतो. पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजुक अविष्कार मला फुलांचा राजा गुलाबापेक्षाही जास्त भावतो.नाजूक चांदण्यासारखी त्याची फुलं आपला मंद सुगंध वा-यावर उधळत होती.
त्याचं ते सुंदर रूप मी डोळ्यांत साठवून घेतलं. शाळेत असताना वाचलेली मंगेश पाडगावकरांची ती सुंदर कविता आठवते. 


टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे ! 

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले ! 

टप टप पडती .... 

दुर दुर हे सूर वाहती
उनहात पिवळया पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले ! 

टप टप पडती .... 

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरिपसारा या गाणयातुन फुले ! 

टप टप पडती .... 

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सुर , चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे ! 

टप टप पडती .... 

कवी: मंगेश पाडगावकर





हिंदीत प्राजक्ताला हरसिंघार म्हणतात. प्राजक्ताच शास्त्रीय नाव आहे 'arbortristese' म्हणजे "दुःखाचं झाड". कदाचित पारिजात रात्री फुलतो आणि सकाळी झाडाने अश्रू ढाळल्यासारखी प्राजक्ताची फुलं खाली जमिनीवर सांडलेली असतात म्हणून असेल. 

आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत खाली पडलेलं फूल देवाला वाहात नाहीत, पण फक्त प्राजक्ताचं फुल असं आहे की जे जमिनीवर पडलेलं असलं तरी उचलून देवाला वाहिलेलं चालतं कारण प्राजक्त हा स्वर्गीय वृक्ष आहे. समुद्रमंथनाच्या वेळी सागरातून जी रत्नं बाहेर निघाली त्यातलं एक रत्न म्हणजे पारिजात. ह्या फुलांच्या प्रेमात पडून इंद्राने तो प्राजक्त स्वर्गात नेला, पण कृष्णपत्नी सत्यभामेने प्राजक्ताच्या फुलांचा हट्ट धरल्यामुळे योगेश्वर श्रीकृष्णाला देखील हे झाड स्वर्गातून आणण्याचा मोह आवरता आला नाही. पण तो पडला श्रीकृष्ण, त्यामुळे त्याने प्राजक्ताचं झाड आणून सत्यभामेच्या महालात लावलं खरं, पण अश्या जागी की झाड सत्यभामेच्या महालात पण त्याची फुलं मात्र पडावी शेजारच्या रुक्मिणीच्या दारी !


गुलाबाच्या सौंदर्यात आव्हान असतं तर प्राजक्तात समर्पण ! माणसाचं जीवनसुद्धा असंच पाहिजे. त्यात आव्हान नव्हे तर समर्पणाची भावना हवी. आव्हानात आवेश असतो, अहंकार असतो, जिंकण्याचा ध्यास असतो, पण समर्पणात निरपेक्ष त्यागाची भावना असते, प्रेमाने जगाला आपलंसं करण्यची इच्छा असते. आयुष्यात आपण नेहमीच बेरीज वजा-बाकी हिशेब करतो. किती सुख आलं किती दुःख गेलं असं करतच आपण आयुष्याचं आणि व्यवहराचं गणित मांडतो. परंतु जेव्हा व्यवहार येतो तेव्हा किती दिले आणि किती घेतले याचीही गोळा-बेरीज होते. पण आयुष्य म्हणजे केवळ बेरीज-वजा-बाकीचं एवढंच असतं का ? कारण काही वेळा या गणितात बाकी उरतच नाही. म्हणून जीवनाला सामोरं जाताना कसलाही हिशेब मांडू नये, हे मला पारिजाताने शिकवलं. त्याची फूलं इवलिशी,नाजूक. त्यांचं आयुष्य एका रात्रीपुरतं. पण त्या लहानशा आयुष्यात ही फुलं आपला सुगंध भरभरून चहूदिशांना उधळतात. उद्या काय होणार, हा विचार न करता आजचा आनंद, सुख जगाला वाटतात. तसंच आपणही आपला आनंद, सौख्य अगदी मनापासून इतरांना द्यावा. त्यांच्याही आनंदात तितक्याच समरसतेने सहभागी व्हावं, पण स्वत:चं दु:ख मात्र शांतपणे डोळ्यांत जिरवावं, ओठांनी पिऊन टाकावं. जे हरपलं ते आपलं नव्हतंच असं समजून पुढे चालावं. जीवनात येणाया पौर्णिमेचा विचार करावा. त्या लक्ष लक्ष चांदण्यांचा आहेर घेऊन सर्वानीच आयुष्य उजळून टाकावं. प्राजक्ताच्या सुकुमार फुलांनी मला दिलेला आजचाच नव्हे तर आयुष्याचा हा लाखमोलाचा संदेश आहे. 

अंगणी पारिजात फुलला बहर तयाला काय माझीया प्रीतीचा आला, 



पारीजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल,पण लयलुट करायाची ती सुगंधाचीच. 





© सुयोग शहा